Rabi Crop Relief : राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. ७) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या अतिरिक्त मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल. शेतीसाठी लागणारे खत, बियाणे आणि इतर खर्च भागवण्यासाठी या निधीची मोठी मदत होणार आहे, असा दावा त्यांनी केला.

पारदर्शक आणि जलद मदतीचा दावा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “या मदतीमुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकांची योग्य तयारी करता येईल आणि त्यांचे उत्पादन वाढेल. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल, ज्यामुळे ही मदत पारदर्शक आणि जलदगतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.”
यंदाच्या खरीप हंगामात मराठवाडा आणि विदर्भासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामात नव्याने उभारी घेण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा, बियाणे आणि युरिया खतांचा पुरवठा तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असेही सांगितले. यासाठी केंद्र सरकारकडेही पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे.

मदतीच्या वितरणाबद्दल प्रश्नचिन्ह कायम
या घोषणेमुळे शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी १८ हजार ५०० रुपये (यापूर्वी जाहीर केलेली मदत आणि ही १०,००० रुपये अतिरिक्त मदत मिळून) इतकी रक्कम मिळणार आहे. विरोधी पक्षांनी ५० हजार रुपये मदतीची मागणी केली होती, त्या तुलनेत ही मदत कमी असली तरी दिलासा देणारी आहे.
मात्र, राज्य सरकार या निधीचे वितरण कधीपासून करणार, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस उत्तर दिले नाही. दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
(Rabi Crop Relief) शेतकऱ्यांची तातडीने मदतीची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ घोषणा न करता तातडीने बँक खात्यात रक्कम जमा करण्याची मागणी केली आहे. रब्बी हंगाम तोंडावर आला असल्यामुळे, ही मदत त्वरित मिळाल्यास कृषी निविष्ठा (खत, बी) खरेदी करण्यासाठी आणि शेतजमिनीच्या मशागतीसाठी मोठा आधार मिळेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असले तरी, ही रक्कम त्यांच्या खात्यात नेमकी कधी जमा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.





