नैसर्गिक संकटांमुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘कृषी समृद्धी’ योजना ठरणार वरदान
Krushi Samruddhi Yojana: महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नैसर्गिक आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पुन्हा सक्षमपणे उभे राहता यावे, यासाठी ‘कृषी समृद्धी योजना’ प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले आहेत. या योजनेचा लाभ गावागावातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले आहे.
Krushi Samruddhi Yojana: पुण्यात नुकतीच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत कृषी समृद्धी योजनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री भरणे होते. यावेळी त्यांनी सांगितले की, कृषी विभागाने ही योजना केवळ कागदावर न ठेवता, कोट्यवधी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची खात्री करावी. “नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी कृषी समृद्धी योजना वरदान ठरू शकते,” असे ते म्हणाले.

या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, पोकरा टप्पा-२ चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक वर्षा लड्डा यांच्यासह कृषी विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


